Tags: Types of food as per Shrimad Bhagvad Geeta, annache prakar,

श्रीमद् भगवद्गीतेत श्रद्धात्रयविभागयोग: या १७व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अन्नाचे प्रकार वर्णिले आहेत. मी संपूर्ण अध्यायाचे फक्त मराठी भाषांतर देत आहे. अन्नसंबंधी श्लोक हायलाईट केले आहेत.
जेवणाचे पान कसे वाढावे हेदेखील वाचावे .
जेवणापूर्वी म्हणायचे श्लोकसुद्धा वाचावे.

अर्जुन म्हणाला, "हे श्रीकृष्णा, जे श्रद्धायुक्त अंतःकरणाचे आहेत, पण शास्त्राविधी बरोबर न पाळता जे यजन करतात, त्यांची निष्ठा म्हणजे मनाची स्थिती सात्विक, राजस कि तामस संजयची?" १

श्री भगवान म्हणाले, ''प्राणिमात्रांची श्रद्धा ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारची असते. या तीन प्रकारांची लक्षणे ऐक. २

हे अर्जुना, सर्वांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या प्रकृतिस्वभावानुसार बनलेली असते. हा मनुष्यप्राणी श्रद्धाशीलच आहे. ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो बनत असतो, हे ओळखून ठेव.  ३

सात्विक वृत्तींचे लोक देवाची उपासना करतात, राजस लोक यक्षराक्षसांची उपासना करतात; आणि तामस लोक प्रेते व भुतेखेते यांची पूजा करतात.  ४

जे ढोंग आणि अहंपणा यांनी भरलेले, भोग, वासना व आसक्ति या विकारबलाने आत्मवश केलेले अविवेकी लोक शरीरातील पंचमहाभूतादि समूहाला, त्याचप्रमाणे अंतःकरणातील शरीरात वास करणाऱ्या मलाही कष्ट देत देत शास्त्राविधीत न सांगितलेले असे घोर स्वरूपाचे तपाचरण करतात, ते लोक आसुरी वृत्तीचे आहेत असं समज.  ५,६

आता सर्व प्राणिमात्रांना आवडणारा आहारदेखील तीन प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे यज्ञ, तप व दान यांचेही तीन प्रकार होतात. त्यांचे भेद सांगतो ते तू ऐक.  ७

आयुष्य, बुद्धी, शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढविणारे असून रुचीकर, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्विक वृत्तीच्या माणसांना आवडतात.  ८


तिखट, आंबट, खारट, अति उष्ण, झणझणीत, नीरस, दाह करणारे; त्याचप्रमाणे दुःख, शोक व रोग उत्पन्न करणारे आहार राजस वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात.  ९


तामस वृत्तीच्या लोकांना आवडणारे अन्न एका प्रहराहून वेळ होऊन गेलेले म्हणजे निवलेले, नीरस, दुर्गंधीयुक्त, शिळे झालेले, उष्टे तसेच अपवित्र असते.  १०



फळाची इच्छा न धरता यज्ञ करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून शांत चित्ताने जो शास्त्राविधीप्रमाणे यज्ञ करतो, तो सात्विक स्वरूपाचा यज्ञ होय.  ११

परंतु हे अर्जुना, फळावरच दृष्टी ठेवून आणि आत्मप्रतिष्ठेकरिता जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ राजस समाज.

शास्त्राविधीला सोडून, अन्नसंतर्पणरहित, मंत्रहीन, दक्षिणरहित व श्रद्धाहीन असा जो यज्ञ त्याला तामस म्हणतात.  १३

देव, ब्राह्मण, गुरु व विद्वद्जन यांचा आदरसत्कार करणे, शुचिर्भूतपणा असणे, सरळपणे वागणे, ब्रह्मचर्य  व अहिंसा याला शारीरिक तप म्हणतात.  १४

कोणाच्याही मनाला न लागणारे; परंतु खरे, गोड आणि पथ्यकारक भाषण करणे आणि स्वकर्माचा अभ्यास यांस वाचिक तप म्हणतात.  १५

मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मुनीप्रमाणे वृत्ती असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यांस मानसिक तप  म्हणतात.  १६

फलाची अपेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीच्या माणसांनी अत्यंत श्रद्धेने व योगयुक्त बुद्धीने हे त्रिविध तप आचरले म्हणजे त्याला सात्विक तप म्हणतात.  १७

आपला सत्कार व्हावा, मान मिळावा, आपली लोकांनी पूजा करावी या हेतूने; त्याचप्रमाणे ढोंग माजवण्याचा हेतूने जे तप आचरले जाते, त्या अस्थिर व अनिश्चित तपाला या लोकांत राजस तप म्हणतात.  १८

हेकटपणाने, स्वतःला पीडाकारक किंवा दुसऱ्याचा नाश करण्याकरिता जे तप करतात, त्याला तामस तप म्हणतात.  १९

दान करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानून आपल्यावर उपकार न करणाऱ्यास योग्य स्थळी, योग्य काळी व पात्रापात्र पाहून जे दान देतात त्याला सात्विक दान म्हणतात.  २०

परंतु जे दान परतफेड होईल या हेतूने किंवा इतर काही फलाच्या अपेक्षेने दिले जाते, आणि शिवाय जे देताना मनाची तडफड होत असते ते राजस दान म्हटले जाते.  २१

अयोग्य काळी, अयोग्य माणसांना, सत्कार न करता, अवहेलना करून जे दिले जाते, त्याला तामस दान म्हणतात.  २२

ॐ तत् सत् असा तीन प्रकारचा ब्रह्माचा निर्देश केला जातो. या निर्देशाप्रमाणे पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले आहेत.  २३

तस्मात् म्हणजे जगाला या संकल्पाने आरंभ झाला आहे म्हणून ब्रह्मचारी लोकांची यज्ञ, दान, तपादि शास्त्रविहित कर्मे नेहमी 'ॐ' असा उच्चार करून सुरु होतात.  २४

मोक्षार्थी लोक फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञ, तप, दान इत्यादि कर्मे 'तत्' या निर्देशाने करतात.  २५

अस्तित्व आणि साधुत्व म्हणजे चांगलेपणा या अर्थी 'सत्' हा शब्द योजिला जातो. तसेच प्रशस्त म्हणजे चांगल्या कर्मालाही 'सत्' हा शब्द योजिला जातो.  २६

यज्ञ, दान व तप करीत राहणे या स्थितीला सत् असे म्हणतात. आणि त्याकरिता केलेल्या कर्मालाही सत्असेच म्हणतात.  २७

हे अर्जुना, अश्रद्धेने केलेले हवं, दिलेले दान, आचरिले तप किंवा इतर कोणतेही कर्म असत् असे म्हटले जाते; ते परलोकांत उपयोगी पडत नाही; व इहलोकांतही उपयोगी पडत नाही.  २८

इति श्रीमद्भगवदगीतासूपनिषत्सु ब्रह्माविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोध्याय:
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।



Tags: Types of food as per Shrimad Bhagvad Geeta, annache prakar,

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.